top of page
Search

आयत्या घरात ‘खेकडोबा’

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Oct 27, 2023
  • 3 min read

Updated: Oct 28, 2023


       सचिन,लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या सुवर्णकाळातील एक चित्रपट. एका मोठ्या बंगल्यातील श्रीमंत कुटुंब वर्षातील काही महिने भारताबाहेर गेलेले असते. नेमक्या याच काळात या रिकाम्या बंगल्यात एक व्यक्ती येऊन मस्त राहतो. पुढे वेगवेगळ्या निमित्ताने  येणाऱ्या आणखी काही लोकांना तडजोड करीत स्विकारतो आणि आपले काम झाल्यावर एखाद्या संन्याशाप्रमाणे कोणताही लोभ न ठेवता निघून जातो. ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटाची ही सर्वसाधारण कथा.

ree

              या चित्रपटातील ‘रिकाम्या घराचा वापर करणे आणि काम झाल्यावर त्याग करणे’ याच तत्वानुसार वागणारा आणखी एक ‘संन्यासी’ आपल्याला समुद्र किनारी आढळतो. सुट्टीचा उपभोग घेण्यासाठी समुद्रकिनारी फिरायला जाण्याची प्रथा जगभरात सर्वत्र ‘भोक्त्या’भावाने पाळली जाते. तिथे फिरण्याचा आनंद घेण्याबरोबरच शंख शिंपले गोळा करण्याचा नाद बहुतेकांना असतो.  कवचधारी प्राण्यांचे किनाऱ्यावर विखुरलले निर्जीव अवशेष गोळा करता करता कधी कधी त्यातून एखाद्या लहान खेकड्यासारखे पाय बाहेर येतात. शंख, शिंपल्यांच्या आयत्या घरात पाय पसरून राहणारा हा खेकडा म्हणजेच ‘संन्यासी खेकडा’. इंग्रजीतल्या ‘Hermit Crab’ या नावावरून त्याचे असे नामकरण झाले आहे. पॅग्यूरॉयडीया (Paguroidea) कुलातील या संन्यासी खेकड्याच्या सात वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास अकराशे प्रजाती जगभरात आढळतात. यापैकी सिनोबीटा स्कॅवोला (Coenobita scaevola ) ही प्रजाती आपल्या देशात अधिक प्रमाणावर आढळते.

ree

              या संन्यासी खेकड्यांची जगण्याची पद्धतही रंजक आहे. समुद्रातील संन्यासी खेकडे श्वसनासाठी कल्ल्यांचा वापर करतात, पण किनाऱ्यावर आढळणाऱ्या खेकड्यांची रचनाही तशीच असल्याने त्यांना आपले कल्ले सतत ओले असणे गरजेचे असते. हे जीव मिश्रहारी असल्याने त्यांच्या आहारामध्ये शुद्ध-अशुद्ध असे भेद नाहीत. सागरी वनस्पतींपासून, कृमी-किटक ते अगदी लहान कोळंबी, कवचधारी जीव त्यांच्या मेनूकार्डवर असतात. अन्नाच्या‍ शोधात फिरताना ते पायांच्या दोन जोड्यांचा वापर हालचालींसाठी करतात. चिमट्यासारखे असणारे पुढील दोन पाय अन्न गोळा करण्यासाठी वापरले जातात.

              या प्राण्याला ‘संन्यासी’ असे संबोधले असले तरी प्रत्यक्षात तो सामाजिक प्राणी आहे. त्यांच्या सोशल क्लबमध्ये शंभरहून अधिक सदस्य असू शकतात. एकत्र राहण्याबरोबरच अन्नाच्या शोधातही ते संघ पद्धतीने काम करतात. इतकेच नाही, तर तो सर्वार्थाने ‘खेकडा’ देखील नाही. त्याला जोडलेल्या दहा पायांमुळे तो खेकड्यासारखा दशपाद होतो. या दहापायांची रचनाही खेकड्यापेक्षा ‘पोच्या’ नावाच्या कोळंबीसदृश प्रजातीशी जवळीक साधणारी आहे. कठीण कवच हे खेकडे वर्गातील प्राण्यांचे वैशिष्ट्य. पण आपल्या संन्याशाच्या शरीराचा एक भाग अतिशय मृदू आणि वळसेदार असतो.

ree

नाही म्हणायला या खेकड्याला बाहेरून शंख शिंपल्यांसारखे कवच दिसते खरे पण या मृदू शरीराभोवतालचे कवच त्याचे नाहीच मुळी. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर या लहान जीवांना संरक्षणाची गरज असते. जसे छत्री सोबत नसताना जोराचा पाऊस लागल्यानंतर आपण पावसापासून वाचण्यासाठी जे हातात मिळेल त्याचेच छत्र डोक्यावर धरतो. अगदी तसेच हा नवसंन्यासी संरक्षणासाठी मिळेल ते स्विकारतो. अंग झाकण्यापुरता निवारा त्याला चालतो. या निवाऱ्यापैकी शंख-शिंपल्यांचे अवशेष ही त्याची प्राथमिकता असते. दशपाद असणाऱ्या या प्राण्याची  मागील पायांची एक जोडी हे कवच घट्ट धरून ठेवण्याचे काम करते. संन्यासी खेकड्याचे हे कवच ‘शोधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर आधारलेले असते. शिंपल्यांच्या कवचातील खेकडा जसा मोठा होऊ लागतो तसे त्याला या आयत्या घराची जागा अपुरी पडू लागते. तो नव्या कवचाच्या शोधात असतो. नव्या घराचा संघर्ष तर सर्वांनाच ठाऊक आहे. रिकाम्या कवचघराच्या प्राप्तीसाठी त्यांच्यात भांडणे मारामाऱ्या होतात. पण त्यातही भरल्या घरातून एखाद्या खेकड्याला हाकलून त्याचे कवच बळकावण्यासारखे मानवी प्रकार इथे घडत नाहीत. त्याऐवजी कवच दानाची सुंदर साखळी संन्यासी खेकड्यांच्या जीवनक्रमात पाहता येते. रॉबिन शर्माच्या ‘द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी’ या पुस्तक शीर्षकाप्रमाणे आपला संन्यासी देखील त्याचे धारण कवच त्यागून पुढे जातो. यावेळेस आकाराने उतरत्या क्रमाने असलेले इतर इच्छुक खेकडे तासनतास नंबर लावून उभे असतात. सर्वात मोठ्या खेकड्याला नवे घर मिळाल्यावर उरलेल्या लहान खेकड्यांचा घरप्रश्न मार्गी लागतो. कोणताही विशेष संघर्ष न करता ही प्रक्रीया पार पडते. मोठ्या भावाला नवे कपडे आणल्यानंतर त्याचे घट्ट होणारे कपडे लहान भावाला देण्याच्या प्रथेचा उगम या खेकड्यांच्या जीवनपद्धतीमध्येच असावा.

ree

               या संन्याशांचे सामाजिकपण इथेच संपत नाही. ‘सी अ‍ॅनिमोन’ सारख्या प्राण्यांना ते आयत्या घरावर पोटभाडेकरू प्रमाणे स्थान देतात. या भाडेकराराचा दोघांनाही चांगलाच फायदा होतो. अ‍ॅनिमोनची दंश करू शकणारी शुंडके परभक्षींपासून संरक्षण करतात. हालचालींमध्येही मदत करतात. इतकेच नाही तर या भाड्याच्या घराच्या भेगांवर घट्ट बसल्याने गळतीपासून संरक्षण होते. खेकड्याने खाल्लेल्या अन्नातील उरलेला भाग या भाडेकरूंच्या वाट्याला येतो. कधी कधी काही प्रकारचे चपटकृमी (flatworms) व इतर परजीवीही भाडेतत्वावर विसावतात. गंमत म्हणजे या आयत्या घराचे हस्तांतरण होताना या भाडेकरूंचेही हस्तांतरण होते.

ree

           संन्यासी खेकड्याच्या शंख शिंपल्यांनी बनलेल्या ‘आयत्या घरात’ राहण्याच्या जीवनपद्धतीचा फायदा  घेण्याचा प्रयत्न मनुष्यप्राण्यानेही केला आहे. रंगीत, कृत्रिम पद्धतीने सजवलेल्या कवचांमध्ये संन्यासी खेकड्याला स्थापन करून घरगुती मत्स्यघरांसाठी त्याची विक्री केली जाते.

ree

परंतु हा प्राणी मुळातच सामाजिक आणि मुक्त जीवनातला असल्याने या बंदिस्त जागेत तो फारसा टिकत नाही. हे कमी आहे की काय म्हणून त्याच्या मोकळ्या अधिवासात मानवाने टाकलेल्या असंख्य वस्तू त्याच्या जीवावर उठतात.

ree

नव्या घराच्या शोधात असताना सहज उपलब्ध होणारा मनुष्यनिर्मित कचरा त्याला आकर्षित करतो. अजाणतेपणी स्विकारलेले हे कचकड्याचे घर त्याच्या शरीराला घातक ठरते.

ree

प्लास्टिकचा विशिष्ट गंधही संन्यासी खेकड्याला गोंधळात टाकतो. ‘ओलेमाईड’ या संयुगाप्रमाणे भासणाऱ्या या गंधामुळे हा खेकडा कधीकधी प्लास्टिकच्या वस्तू खातो आणि त्याचे पर्यावासन मृत्यूत होते. आयत्या पण नैसर्गिक घरात राहणाऱ्या या खेकड्याला मनुष्याच्या समुद्रातील हस्तक्षेपाने त्रासच होतो आणि कलियुगाच्या नियमाप्रमाणे ‘चोर सोडून संन्याशालाच फाशी’ मिळते. असो, यापुढे किनारी भागातील शिंपले गोळा करताना असा संन्यासी दिसलाच तर “पहा, निरीक्षण करा आणि सुरक्षितपणे सोडून द्या.


  • तुषारकी (tusharki)

2 Comments


db3ganesh
Oct 28, 2023

अप्रतिम लेख आहे

Like
Tushar Chandrakant Mhatre
Tushar Chandrakant Mhatre
Oct 28, 2023
Replying to

Thank you!

Like
Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page