top of page
Search

‘निरा’ हे सदा के लिए!

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Jan 9
  • 3 min read

ree

श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी. या राजवंशातील ‘छित्तराजा’चा मुरूडजवळील भोईघर येथे सापडलेला एक ताम्रपट आहे. इसवी सन १०२४च्या या ताम्रपटात नारळ, फणस, चाफा, आंबा यांवरील कर पद्धतीची माहिती दिली आहे. या ताम्रपटातील एका वाक्याची अंमलबजावणी अगदी हजार वर्षानंतरही कायम आहे. ही ओळ अशी आहे-

‘सुरामण्डवृक्षश्चाभ्यन्तरवर्ती बाह्यो वा राजकीय एव’

म्हणजे, ‘ज्या वृक्षांपासून ‘सुरा’ अर्थात दारू निघते, ते सर्व वृक्ष बाहेर असोत वा आत, राजाच्या/सरकारच्या अखत्यारीत आहेत!’

अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध ‘सरकारमान्य’ या शब्दाचा उगम अशाच आदेशांमध्ये असल्याचे सांगता येईल. आधुनिक काळातही ताड, माड, खजूर, शिंदी यांसारखे तालवृक्ष सरकारच्या अखत्यारीत येतात. पर्यायाने या वृक्षांशी निगडीत व्यवसायांवर देखील सरकारची नजर असते.

आपणही इथे अशाच एका सुरावृक्षाशी संबंधित ‘सरकारमान्य’ व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत; फरक इतकाच की- आपण ‘सुरे’च्या वाकड्या मार्गात न शिरता सरळमार्गाने ‘निरा’ व्यवसायाकडे वळणार(!) आहोत.

ree

उन्हाच्या दिवसांमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला “निरा आहे!“ असा बोर्ड आपल्याला थांबयला भाग पाडतो. उन्हापासून दिलासा मिळावा आणि शरीर हायड्रेट रहावे यासाठी निरा प्यायली जाते. उन्हाळ्यात ‘ताजी’ नीरा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. शिंदीचे झाड निरा उत्पादनासाठी योग्य समजले जाते. शिंदी म्हणजे एकप्रकारचे खजुराचेच झाड. खजुर फळाने कडक डाएटींग केली तर काय घडेल? अशाच अवताराची हाडाळ फळे शिंदीची असतात. शिंदीच्या झाडापासून मिळणारी नीरा ही काहीशी पांढऱ्या रंगाची असते. ती चवीला गोड असते. दुधाचं रुपांतर जसं दह्यात होतं, तसंच काहीसं निरेच्या बाबतीत घडतं. निरामध्ये यीस्ट, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, साखर, प्रोटीन, अमिनो अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन सी, बी-१, बी-२ आणि बी६ हे पोषक घटक असतात. यीस्टमुळे त्यात किण्वन प्रक्रिया होऊन अल्प प्रमाणात अल्कोहोल बनू शकते. मद्यार्क असलेले हे द्रावण आपण ताडी म्हणून ओळखतो. अर्थात बाजारात उपलब्ध होणारी नीरा ही अल्कोहोलयुक्त नसते आणि आरोग्याला पोषक असते. सर्वसाधारणपणे तालवृक्षांपासून (Palm Trees) मिळणाऱ्या गोड चवीच्या द्रवाला आपण निरा म्हणतो. पण यातही थोडाफार फरक आहेच. खजूर, शिंदी, ताड यांपासून मिळणाऱ्या मधुर स्रावांच्या स्वाद व गुणधर्मांमध्ये सूक्ष्म भेद राहतो.

ree

अत्याधुनिक काळातही निरा मिळवण्यासाठीचा संघर्ष जीवघेणा असतो. तीस ते पन्नास फूट उंचीच्या सरळसोट खोडावर चढणे हे अत्युच्य कौशल्याचे काम. कमरेला विशिष्ट पद्धतीने दोरीचा पट्टा बांधून, पायाला तसाच दुसरा दोर बांधून ही चढाई केली जाते. कमरेला लटकवलेला कोयता, सुरक्षितपणे बांधलेले मडके या सुसज्ज अवतारात पाहून ‘चढाई’ ऐवजी ‘लढाई’चाच भास होतो. संध्याकाळच्या वेळेस हा चढाईस्वार झाडावर चढून तिथे कोयत्याने खापे मारतो. या खाप्यांमधून थेंब थेंब गोड रस पाझरतो. हा थेंब मडक्यात पडेल अशा रितीने मडके बांधले जाते. निरा आंबू नये म्हणून मडक्याला आतून चुन्याचा लेप लावलेला असतो. मडके बांधून चढाईस्वार पुन्हा आपले कौशल्य दाखवत सरसर खाली उतरतो. रात्रीच्या थंड तापामानात स्रवण्याचा वेग वाढतो. थेंबे थेंबे मडक्याचे तळे साचत राहते. सकाळी पुन्हा झाडावर चढून भरलेले मडके सांडू न देता उतरवले जाते. रोज एका ताडाच्या झाडापासून जवळजवळ चार ते पाच लिटर निरा मिळते. सर्व झाडांपासून मिळालेली निरा एकत्र करून ती बाजारात विक्रीसाठी पोहोचवली जाते. निरा काढल्यापासून २४ तासाच्या आत त्याचा वापर करावा लागतो. सध्या टपऱ्यांवर निरा म्हणून विकला जाणारा हा द्रव आंबू नये म्हणून बर्फाच्या भांड्यात ठेवला जातो.

ree

ताडाची, शिंदीची झाडे मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोकण पट्ट्यात सप्टेंबर ते जुलै या कालावधीमध्ये निरा विक्री व्यवसाय केला जातो. यातून खेड्या-पाड्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निरा विक्रीसाठी परवाना मिळतो. निरेत प्रक्रिया होऊन तिचे ताडीत रुपांतर होऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना व्यावसायिकांना दिली यानुसार महाराष्ट्रात निरा सोसायट्या स्थापन केलेल्या असून त्यांनी परवाना दिलेल्या टपऱ्यांवर, दुकानांमध्ये ही विक्री करता येते. विक्रीचे जाचक नियम, भेसळ आणि गैरमार्गाने केलेली मद्यार्क निर्मिती यांमुळे प्रामाणिकपणे कष्टाचा व्यवसाय करणाऱ्यांचे नुकसान होते. ‘जितके कायदे कडक, तितकी भ्रष्टाचाराची शक्यता अधिक,’ हे सूत्र इथेही लागू पडते. भविष्यात या व्यवसायाला अधिकाधिक सुनियंत्रित करून योग्य उत्पादन व्हायला हवे. तरच हा ‘निरा’ व्यवसाय ‘सदा के लिए’ राहील!


- तुषार म्हात्रे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page