top of page
Search

गुलाबी परेड

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Sep 24
  • 2 min read

ree

आपल्याला परेड म्हटलं की लगेचच स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाची आठवण येते. राजपथावरून ताठ मानेने चालणारे पायदळ, टँक, मिसाईल्स आणि झेंडे आठवतात. पण मुंबई-नवी मुंबईच्या खाडीत दरवर्षी रंगणारी परेड काही वेगळीच असते. येथे ना टँक, ना झेंडे, ना वर्दी. इथे दिसतात ते हजारोंच्या थव्याने उतरलेले गुलाबी पाहुणे; फ्लेमिंगो! मराठीमध्ये रोहित या नावाने परिचित असणाऱ्या या पक्ष्याचे शास्त्रीय नाव फिनिकोप्टेरस फिनिकोपारस (Phoenicopterus Phoenicoparrus) आहे.

ree

दरवर्षी फेब्रुवारी ते मे या काळात खाडी परिसर एकदम गुलाबी कॅटवॉक रॅम्पसारखा भासतो. एखाद्या भव्य फॅशन शोमध्ये आपण शिरलो की काय, अशी शंका वाटावी. उंच, सडसडीत पाय, लांबसडक मान, आणि नजरेत भरणारा गुलाबी रंग. फ्लेमिंगोंचा देखावा थेट कॅमेराकडेच ओढतो. सोशल मीडियावर त्यांच्या छायाचित्रांचा पूर उसळतो. निसर्गाने स्वतःचा शोभिवंत ‘फोटोशूट’ इथे उघड्यावर मांडला आहे, असं वाटावं. पण या गुलाबी शोभेमागचं खरं कारण आहे अन्नाचा शोध. इथल्या खाड्यांमधल्या चिखलात सूक्ष्मजीव, शिंपले, शैवाळे आणि प्लॅन्क्टन्स मुबलक प्रमाणात असतात.

ree

फ्लेमिंगोंच्या चोची खास तयार झालेल्या असतात, जणू नैसर्गिक फिल्टरच!फ्लेमिंगोचे चोचीचे कार्य पाणी आणि गाळ गाळून खाद्य मिळवणे हे आहे. ते आपले डोके उलटे करून चोचीने पाण्यातील गाळ आणि अन्नकण एकत्र खेचून घेतात आणि 'लॅमेली' (lamellae) नावाच्या केसासारख्या संरचनेचा वापर करून अन्न फिल्टर करतात. त्यांच्या पायांच्या हालचालींमुळेही पाणी व गाळ हलतो, ज्यामुळे अन्नकण चोचीपर्यंत पोहोचतात. रोहित पक्षी जन्मजात गुलाबी नसतात. आपल्याकडे लाजून गुलाबी होणे प्रकार प्रसिद्ध आहे. फ्लेमिंगो खाऊन गुलाबी होतात. त्यांच्या आहारात असणाऱ्या कॅरोटेनॉइड रंगद्रव्यांमुळेच त्यांचा रंग गुलाबी होतो.

वैज्ञानिक भाषेत फ्लेमिंगो हे मायग्रेटरी बर्ड्स आहेत. हजारो किलोमीटर दूर आफ्रिका, इराण, तुर्कस्तान अशा प्रदेशांतून ते दरवर्षी मुंबई-नवी मुंबईच्या खाड्यांमध्ये पोहोचतात. आपण लोकल ट्रेन पकडून रोजच्या धावपळीत जगतो आणि हे पक्षी मात्र फ्री फ्लाइटने थेट इथे उतरतात. एवढा लांब प्रवास करून आलेले पाहुणे आपल्या खाड्यांमध्ये आरामात थांबतात आणि हजारोंच्या थव्याने गुलाबी परेड सादर करतात.

ree

फ्लेमिंगोंचे जीवनमान अत्यंत शिस्तबद्ध आहे. ते मोठ्या थव्याने एकत्र राहतात, एकत्र खातात आणि एकत्रच उडतात. समुद्राच्या पृष्ठभागावर त्यांचे गुलाबी थवे दिसले की पूर्ण परिसर एखाद्या रंगमंचात बदलतो. त्यांचे आकाशातले थवे इंग्रजीच्या व्ही- आकारामध्ये मध्ये उडताना दिसतात. यामागे शास्त्र आहे, पुढच्या पक्ष्यामुळे मागच्यांसाठी हवेचा अवरोध कमी होतो. यातून सर्वांचा प्रवास सुलभ होतो. हे निसर्गातल्या टीमवर्कचं उत्तम उदाहरण आहे.

पण या गुलाबी परेडपुढे मोठं संकट उभं आहे. शहराचा झपाट्याने होणारा विकास, उंच इमारती, बंदरं, रस्ते, वीज प्रकल्प, कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे फ्लेमिंगोंचे अधिवास कमी होत आहेत. खाडीतील गाळाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. नवी मुंबईतील काही भागात फ्लेमिंगो सॅंक्च्युरी जाहीर करून त्यांचे संरक्षण सुरू आहे, पण वाढत्या नागरीकरणाच्या लाटेसमोर ते पुरेसं ठरत नाही.

पण खरी जबाबदारी आपली आहे. फ्लेमिंगोंचं खरं घर म्हणजे आपल्याकडच्या खाड्या. त्यांना सुरक्षित अधिवास मिळालाच, तरच त्यांच्या गुलाबी परेडचं सौंदर्य पुढील पिढ्यांनाही पाहायला मिळेल.

ree

नाहीतर काही आणखी काही वर्षांनी आपल्याला नवी मुंबईत जागोजागी असणाऱ्या फ्लेमिंगोंच्या प्रतिमांवरच समाधान मानावे लागेल.


- तुषार म्हात्रे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page