top of page
Search

चंदेरी दुनियेतला सोनेरी कोल्हा

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Sep 24, 2024
  • 3 min read


ree

मानवी स्वभावांचे वर्णन करताना एखाद्या प्राण्याशी तुलना करण्याची पद्धत सर्वत्रच आहे. या पद्धतीमुळे ‘शेरदिल’, ‘भित्रा ससा’, ‘बोलका पोपट’ अशा उपमा तयार झाल्यात. (यातले काही उपमान हे उपमेयाचे अपमान करणारे असल्याने, ते टाळलेलेेच बरे!) विविध कथा, किस्से, पुराणे यांतून या उपमा आपल्या इतक्या अंगवळणी पडली आहेत, की कोल्हा हा धूर्त आणि लांडगा हा लबाडच असला पाहीजे अशी आपली खात्री पटते.  यातल्या कोल्ह्याच्या कथांना तर अंतच नाही. पंचतंत्र, इसापनिती आणि लोककथांमध्येही तो आपल्याला भेटतो. अगदी महाभारतातही कोल्ह्याची एक कथा येते ज्यात तो आपले मित्र, वाघ, लांडगा , मुंगूस आणि उंदीर यांच्यात भांडण लावून स्वत:चे इप्सित साध्य करतो. हे कमी आहे की काय म्हणून काही ठिकाणी कोल्ह्यांना देवत्वाशी जोडले आहे. भारत, जपानसह काही देशांमध्ये कोल्हा हा दैवी प्राणी मानला गेलाय. इजिप्तमध्ये कोल्हा हा प्राणी अनुबिस(Anubis) या एका प्राचीन देवतेशी संबंधित मानला गेला आहे.


ree

अनुबिस या मृत्यूदेवतेचे चित्रण करताना तिला कोल्ह्याच्या रुपात दर्शवले जाते. एकाच वेळी धूर्त, भित्रा, भयावह अशा विविध भावनांशी जोडलेल्या कोल्हा या प्राण्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण हा सर्वसामान्य कोल्हा नसून कोल्हा (Fox) आणि लांडगा(Wolf) या दोन्ही प्रजातींशी साधर्म्य राखणारा भारतीय सोनरी कोल्हा (Indian Golden Jackal) आहे. सुमारे दोन शतकापूर्वीही मुंबईच्या चंदेरी दुनियेत सोनेरी कोल्ह्याचा (गोल्डन जॅकल) वावर असल्याचे दाखले मिळतात. तर, आताही ठाणे, नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून देखील त्यावर अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे त्यांची संख्या, माहिती तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी, सोनेरी कोल्हा अजूनही काहिसा दुर्लक्षित आहे. 

   


ree

 कॅनिडी या कुत्र्यांच्या कुळातील सोनेरी कोल्हा ‘कॅनिस ओरीयस इंडिकस (Canis aureus indicus)’ या शास्त्रीय नावाने परिचित आहे.लहान पाय, झुबकेदार शेपूट आणि टोकदार तोंडाचा हा कोल्हा त्याच्या शरीररचनेमुळे आकर्षक दिसतो. उन्हाळ्यात फिकट गुलाबी रंगाची केशरचना असणारा हा प्राणी गुलाबी थंडीत मात्र सोनेरी पिवळा बनतो. त्याच्या बाबतीत ‘पाय लहान पण वेग महान’ असा प्रकार असल्याने तो एक चांगला शिकारी बनला आहे. या अंगभूत गुणांमुळे तो लहान प्राणी किंवा पक्ष्यांना सहजपणे पकडू शकतो. सोनेरी कोल्हे हे सर्वभक्षक (omnivores) आहेत, त्यामुळे ते लहान प्राणी, पक्षी यांसह किटक, फळे यांसारखे पदार्थही खातात. त्यांच्या डाएट चार्टमध्ये मृत प्राण्यांचे मांसही चालते. कुत्र्याचा जवळचा नातेवाईक असल्याने सोनेरी कोल्हा आपल्या परंपरेला साजेसा गुरगुरतो,भुंकतो आणि किंचाळतोसुद्धा. फक्त हे भुंकणे कुत्र्यांच्या भुंकण्यापेक्षा खूपच वेगळे आणि विशिष्ट असते. जंगलच्या दुनियेत ‘नाईट लाईफ’ला  बंधन नसल्याने हे कोल्हे रात्री अधिक सक्रिय असतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये कमी प्रकाशातही स्पष्ट दिसण्याची क्षमता असते, ज्यामुळे ते रात्री सहज शिकार करू शकतात. ही झाली सर्वसामान्य जंगली श्वापदाला आवश्यक असणारी वैशिष्ट्ये, पण विविध कथांमध्ये धूर्त मानला जाणारा कोल्हा खरंच धूर्त असतो का?

   


ree

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सोनेरी कोल्ह्याची काही आणखी वैशिष्ट्ये पाहूया. भारतीय सोनेरी कोल्हा उत्तम खंदक खोदू शकतो. एखाद्या बेसमेंटप्रमाणे जमिनीत खोदलेल्या खोल खंदकामुळे तो उष्णतेपासून आणि थंडीतून बचाव करू शकतो. हे प्राणी आपल्या परिसराचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करतात. त्यांची राहण्याची जागा ते झाडे झुडुपे आणि दगडांचा  वापर करून लपवतात. सोनेरी कोल्हा कधीकधी आपल्या भक्ष्याला फसवण्यासाठी मेल्याचे सोंग करतो आणि सावज टप्प्यात आल्यावर अचानक उडी मारून शिकार पकडतो. हे सर्व गुण भारतीय सोनेरी कोल्ह्याला  खऱ्या अर्थाने धूर्त बनवतात. त्यांची सवय आणि स्वभाव हीच त्यांची खरी ओळख आहे. या सर्व सवयी पाहून तुम्हाला त्याची मानवाशी तुलना करावीशी वाटत असेल, तर आणखी काही गोष्टी त्याला मानवाच्या जवळ आणतात.

हे कोल्हे सामान्यतः जोडप्यांमध्ये राहतात. पिल्लांचा सांभाळ करताना दोन्ही पालक खूपच निष्ठावान असतात. कोल्ह्यांची जोडपी ‘हम साथ साथ है’ म्हणत बराच काळ सोबत राहील्याचे निरीक्षण आहे.

     हे प्राणी त्यांच्या अनुकूलनक्षमतेमुळे विविध प्रकारच्या वातावरणात राहू शकतात, ज्यामुळे त्यांची संख्या अनेक ठिकाणी चांगली आहे.भारतीय सोनेरी कोल्ह्यांची  संख्या संपूर्ण भारतात स्थिर आहे, आणि त्यांच्या अस्तित्वाला सध्यातरी कोणता मोठा धोका नाही. ही संख्या स्थिर राहिल्यामुळे त्यांना सध्या “सर्वात कमी चिंताजनक” (Least Concern) वर्गात टाकलं आहे.


ree

सोनेरी कोल्ह्यासाठी मुंबईतील खारफुटींची जंगले हा एक सुरक्षित अधिवास आहे. पण या वनांच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात मानवी वस्ती असल्याने, त्यांचे अधिवास क्षेत्र आता कमी होत चालले आहे. कोल्हे कधीकधी मानवी वस्त्यांजवळ येऊन कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील खाद्य पदार्थ खातात. यामुळे अनेक वेळा उरण, नवीमुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, वसई येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. सोनेरी कोल्हा धूर्त असला तरी मानवाचा बेरकीपणा त्याच्यात नाही. भविष्यात या प्राण्यांच्या अधिवासात होणारे बदल, शिकार आणि जंगलतोड यामुळे त्यांच्या संख्येवर नक्कीच परिणाम होऊ शकेल. या प्राण्यांची अचूक गणना आणि मुंबईच्या चंदेरी दुनियेत अधिवासाचे अभयदान दिल्यास या कोल्ह्याचे भविष्यदेखील सोनेरी असेल त्याच्या रंगासारखेच!


 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page