top of page
Search

मागूर आणि ‘थाई’ भाई!

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • May 28
  • 3 min read

 

ree

 

      ‘प्राण्यांची परीक्षा’ नावाची एक मजेदार कथा आहे. ज्यात हे प्राणी जंगलात एक शाळा सुरू करतात. या शाळेतले विषय पळणे, पोहणे, झा़डावर चढणे, हवेत उडी मारणे, बिळे खणणे असे जंगलीच असतात. परीक्षेत सर्व विषय सक्तीचे असल्याने सर्वांनाच सर्व कौशल्ये दाखवावी लागतात. या कथेतील गोगलगाय पळण्याच्या विषयात नापास होते, तर हत्ती झाडावर चढताना पडतो.

प्राण्यांची परीक्षा
प्राण्यांची परीक्षा

बिळे खणताना पक्ष्यांना दुखापत होते. मासा पोहताना पहिला क्रमांक मिळवतो खरा, पण इतर विषयांच्या परीक्षेत मात्र सहभागीच होत नाही. अखेरीस हे प्राणी एखाद्या विषयात अव्वल, पण कोणत्या ना कोणत्या विषयात नापास होतात. या कथेत एक प्राणी मात्र या सर्वच विषयात काठावर पास होतो आणि सर्व विषयात पास झाल्याने जंगलातल्या शाळेत त्याचाच प्रथम क्रमांक येतो.

     मूळ कथेतला विजेता कोणीही असो, पण ज्याला ‘पाण्यात पोहता येतं’, ‘जमिनीवर चालता येतं‘, ‘बिळ खणता येतं’, ‘उडी मारता येते’ अशा गुणांंचं वर्णन वाचलं तर काही जीव आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात. 

   आपण ज्या प्राण्याविषयी आज माहिती घेणार आहोत हा जीव असाच काहीसा आहे. त्याला पाण्यात चांगलं पोहता येतं, जमिनीवर तो सरपटत-उड्या मारत मार्गक्रमण करू शकतो, दलदलीत बिळ सुद्धा करू शकतो.  तो जितका वैशिष्ट्यपूर्ण आहे तितकाच धोकादायकही आहे. पाण्यातल्या या माशाला अटक करण्यासाठी थेट केंद्र सरकारकडून आदेश काढले जातात.

ree

मांजराप्रमाणे मिशा असल्याने त्यांना इंग्रजीत ‘कॅटफिश’ असे म्हणतात. ‘कॅटफिश’ भाईबंदातील या माशाचे नाव ‘मागूर’. काही ठिकाणी त्याचा उच्चार ‘मांगूर’ असाही होतो. मागुर माश्यामध्ये भारतीय मागूर (Clarias batrachus), थाईमागूर (Clarias gariepinus) व मोठया डोक्याचा मागूर (Clarias macrocephalus) ह्या तीन  प्रजाती आहेत. भारतीय मागूरला ‘देशी मागूर’ किंवा ‘गावरान मागूर’ म्हणतात.

ree

भारतातील विविध राज्यामधील ही मूळ प्रजाती आहे. मागूर हा बिहार राज्याचा राज्यमासा आहे.  आफ्रिका, आशिया, फिलिपीन्स, भारताचा पूर्व किनारा ते मलाया द्वीपकल्पापर्यंत हे मासे प्रामुख्याने आढळतात.तर मोठया डोक्याचा मागूर (Clarias macrocephalus) मलेशिया, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम ह्या देशामध्ये आढळतो. हा मासा उभयचर असल्याने किनाऱ्यालगत, नदीमुखातल्या चिखलात व दलदलीत सापडतो.

ree

    मागूरच्या शरीराचा रंग लालसर तपकिरी ते काळपट हिरवा असतो.  त्वचेवर खवले नसल्याने शरीर गुळगुळीत असते. या माशाच्या पाठीवर फिकट पांढरे ठिपके असतात. त्यापैकी नर माशाच्या पाठीमागच्या भागावर गडद काळा डाग असतो.

मांगूरचे शरीर लांबट असते.  डोके दोन्ही बाजूंनी दबलेले, रुंद व चपटे असते.  ‘मुँछे हो मांगूर जैसी!’, असं वर्णन व्हावं इतक्या त्याला लांब मिशांच्या चार जोड्या असतात. ‘मछली जल की रानी है’ हे खरं असले तरी सध्याच्या काळात ‘मांगूर जल का राजा है’ आणि त्याच्या बाबतीत  ‘बाहर निकालो तो मर जाएगी’हे बाकी सत्य नाही. मांगूर बराच काळ पाण्याबाहेर राहूनही जिवंत असतात. या माशामध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वसन करण्यासाठी खास श्वसनेन्द्रिय असतात. त्यामुळे हा मासा श्वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. अर्थातच त्याला अधिक काळ पाण्याबाहेर राहता येते. हवेत श्वसन करण्याची, पाण्यातील कमी प्राणवायुमध्ये जिवंत राहण्याची क्षमता असल्याने या माशाचे संवर्धन वाढते. मागूर अतिशय खादाड आहे. कृमी, कालव, छोटे मासे हे त्याचे प्रमुख खाद्य असले, तरी काही जाती वनस्पतीजन्य पदार्थही खातात. मागूर माशाची मादी तलावाच्या किनाऱ्याजवळ घरटे करून त्यात अंडी घालते. तर नर अंडी उबवण्याचे कठीण काम करतो.

   देशी मागुर मासा त्याच्या उत्तम चवीसाठी प्रसिद्ध आहे. या माशामध्ये खनिजे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण अधिक असते. तर मेदाचे प्रमाण अत्यंत कमी असते. मागूर माशाच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला न्यूट्रिशिअस मासा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात याचे वार्षिक उत्पन्न पाचहजार टनांपर्यंत आहे. मत्स्यालयात लहान-मोठे मागूर मासे नेहमीच पहायला मिळतात.

असे असूनही या माशाला धोकादायक का मानले जाते?

ree

१९९७ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे मागूर माशावर बंदी का घातली गेली?

कारण देशी मागूर माशाबरोबर विदेशी थाई मागूरने आपल्या परिसंस्थेत घुसखोरी केली आहे. हा थाई मागूर (Thai Magur) मात्र मानवी आरोग्यास हानिकारक असतो. म्हणजे धोकादायक असणारा हा मासा आपल्या मागूरचा ‘थाई’ भाई आहे. थाई मागूर जलीय परिसंस्थांमधील इतर घटकांसाठी हानिकारक आहे. तसेच हा मासा  इतर प्रजाती लुप्त होण्यासही कारणीभूत समजला जातो. थाई मागूर दिसायला देशी मागूरसारखाच असल्याने या दोन्ही माशांतील फरक ओळखणे कठीण जाते. थाईमागुर (Clarias gariepinus) १९८९ च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशमधून बेकायदेशीररित्या भारतामध्ये थाई मागूर चा प्रवेश झाला. १९९७ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे माशांवरील थाईमागूर (Clarias gariepinus) बंदी घालण्यात आली होती. तज्ञांच्या मते या थाई मागूरच्या सेवनामुळे मनुष्यास गंभीर आजार देखील होऊ शकतात. थाई मागूर या माशाने जलाशयात घुसखोरी केल्यानंतर मूळ जलचरांवर परिणाम होतो. यामुळे जलीय पर्यावरणावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. थाई मागूर जलाशयातील सर्वप्रकारचे अन्न स्वतः खातो. इतर जातीच्या माशाची वाढ पुरेपूर प्रमाणात होत नाही.  म्हणून भारत सरकारने थाई मागूर संवर्धनावर बंदी आणली आहे. भारतीय मागूर संवर्धनास भारत सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. थाई मागुरचे वाढ जास्त असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये हा मासा जास्त प्रचिलित आहे. त्याचबरोबर बाजारात कमी किंमतीत मिळत असल्याने गरीब वर्गामध्ये त्याची मागणी जास्त आहे. या माशाचे संवर्धन करणाऱ्यांना संभाव्य दुष्परिणामाची फारशी जाणीव नाही. शासकीय मत्स्यपालन संस्थांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन देशी मागूरचे संवर्धन करायला हरकत नाही, पण आपल्या पर्यावरणात मिसळलेल्या ‘थाई मागूर’च्या बाबतीत मात्र भाईचारा करण्यात अर्थ नाही.

 

- तुषार म्हात्रे

  

 

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page