
पायरेटस् ऑफ द ‘खारे’बियन!
- Tushar Chandrakant Mhatre

- Aug 8, 2020
- 3 min read
पायरेटस् ऑफ द कॅरेबियन’ नावाचा एक धम्माल हॉलिवूडपट ठाऊक असेलच. डिस्ने पिक्चर्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे आतापर्यंत पाच भाग प्रदर्शित झालेत. या चित्रपटात पायरेटस् म्हणजेच समुद्री लुटारू आणि त्यांचा जॅक स्पॅरो नावाचा एक धूर्त स्वयंघोषित कप्तान अशी पात्रे आहेत. या लुटारु टोळ्यांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विविध कथानके या चित्रपटात गुंफली आहेत. या कॅरेबियन चाच्यांच्या टोळीसारख्याच एका ‘खारे’बियन टोळीने आपल्या मुंबई, गोव्याच्या खारपट्टयांत देखिल शिरकाव केला आहे. ते कसे आले ठाऊक नाही. पण पावसाळ्याच्या उत्तरार्धात त्यांचं दर्शन वारंवार होऊ लागलंय. त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे सर्व माध्यमांना त्यांची नोंद घ्यावी लागली. पाहुणे म्हणून मुंबईच्या किनारपट्टीवर आलेल्या या जीवांना समुद्री घुसखोरच म्हणावे लागेल इतकी त्यांची सध्या दहशत आहे. अवेळी आलेल्या या अतिथींना सध्यातरी ‘अतिथी तुम कब जाओगे?’ असे म्हणायची वेळ आलीय. मनुष्यप्राण्याने इंच न इंच जागा व्यापलेल्या मुंबईच्या दाट वस्तीमध्ये किनारपट्टीलगत घुसखोरी करणारे हे अतिथी कोण आहेत?
सध्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दहशत पसरवणारे हे समुद्री चाचे म्हणजे ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’.
पायरेटस् ऑफ कॅरेबियन या चित्रपटात समुद्री लुटारूंच्या टोळीचे व्यवस्थापन दाखवले आहे. यात जहाजाचे खलाशी, लढणारे चाचे, सफाई कामगार, वल्हे चालवणारे गुलाम, आचारी अशी कामाची विभागणी केलेली असते. या सर्वांच्या समन्वयातून टोळीचे काम चालते. आपण ज्या ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’बद्दल बोलतोय तो देखिल या टोळ्यांप्रमाणेच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश हा जेलीफिशच नाही. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर (Portuguese man-of-war) या नावाने ओळखला जाणारा हा प्राणी एक सिफोनोफोर आहे. म्हणजे सोप्या भाषेत अनेक जीवांपासून बनलेला. हो तुम्ही वाचलंत ते बरोबर आहे. ब्ल्यू बॉटल जेलीफिश ‘हा’ प्राणी नसून ‘हे’ प्राणी आहेत. फायसेलिया फायसेलीस (Physalia physalis) असे शास्त्रीय नाव असणारी ही प्रजाती चार वेगळ्या जीवांनी मिळून बनलेली आहे. एखाद्या संघटीत टोळीप्रमाणे यातील चजीव आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. या प्राण्याची ओळख असणारा निळ्या जांभळ्या बाटलीसारखा आकार या टोळीतल्या पहील्या प्राण्यापासून बनलाय. हवेने भरलेला हाच बाटलीसारखा फुगीर आकार या जीवाला तरंगण्यास मदत करतो. याला निमॅटोफोर (pneumatophore) म्हणतात. हा पारदर्शक भाग जेलीफिशसारखा असल्यामुळेच या सजीवाच्या नावात जेलीफिश हे विशेषनाम जोडलं गेलं.
या टोळीतल्या दुसऱ्या प्राण्यापासून ऑक्टोपसच्या हातांसारखे भासणारी शुंडके (tentacles) बनली आहेत.
या टोळीतील तिसरा सदस्य आचाऱ्याचे काम करतो. या भागाला गॅस्ट्रोझॉइडस् (gastrozooids) म्हणून ओळखले जाते. तरंगत्या भागाच्या खालच्या बाजूला लागून असणारे हे प्राणी शुंडकांनी मिळवलेल्या अन्नाचे विशिष्ट संप्रेरकांच्या साह्याने पचन करतात. त्यानंतर मोठ्या अन्नकणांचे उपयुक्त अशा लहान कणांमध्ये रूपांतर करून त्याचे उर्वरीत सदस्यांना वाटप केले जाते. थोडक्यात संपूर्ण टोळीच्या पोषणाची जबाबदारी या सदस्याकडे असते.
या टोळीतला शेवटचा सदस्य म्हणजे गोनोझॉइडस् (gonozooids). वंशवृद्धीचे काम या सदस्याचे. हा भाग द्विलिंगी म्हणजे नर आणि मादी दोन्ही प्रकारांचे एकत्रिकरण असलेला. या भागातूनच पुढे अलैंगिक पद्धतीने प्रजनन होऊन नविन टोळीची निर्मिती होते.
दिसायला आकर्षक परंतु तितकेच धोकादायक असणाऱ्या या समुद्री घुसखोरांनी अनेकांना दंश केल्यामुळे त्यांचे अस्तित्व माध्यमांना जाणवले. त्यांनी लगेचच या समुद्री पायरेटसच्या कहाण्यांमध्ये याच समुद्राचंच मीठ मिसळून माध्यमांद्वारे अधिकच रंगवून सादर केल्या गेल्या. त्यामुळे या घुसखोरांकडे लोकांचं अधिकच लक्ष गेले. खरं तरं या पाहुण्यांचं घर आहे समुद्र आणि समुद्रात त्यांचं अस्तित्व आढळणे ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यांनाही आपल्यासारखं गरम पाण्यात डुंबायला आवडतं, त्यामुळे पाण्यांच्या प्रवाहाबरोबर, बदलत्या तापमानाबरोबर त्यांच्याही जागा बदलत राहतात. या सर्वांच्या जोडीला आणखी एक मानव नावाचा प्राणी आहे, ज्याचं घर जमिनीवर आहे. त्याचं शरीर पाण्यातल्या जीवनासाठी अनुकूल नाही. पण तो प्राणी स्वत:ला सर्वशक्तिमान समजतो आणि समुद्रामध्ये स्वत: घुसखोरी करतो आणि या घुसखोरीदरम्यान मूळ समुद्रातल्याच जीवांनी त्याला काही अपाय केला तर असे कसे घडले म्हणून आकांडतांडव करतो. या पाहुण्यांना पिटाळून लावण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याचे ठरवतो. त्यांना दुसऱ्या प्रदेशातून आलेले म्हणून घुसखोर ठरवतो. पण ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’ खरंच घुसखोर आहेत का?
विचार करा आणि ठरवा समुद्रातला खरा घुसखोर कोण?
‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’ ज्याचं घरंच समुद्र आहे तो की ‘मानव’ ज्याचं घर जमिनीवर असूनही समुद्रात मुक्तपणे संचार करण्याचा प्रयत्न करतो तो?










Comments