top of page
Search

खारपट्टयातील रामबाण

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Feb 22, 2021
  • 2 min read

Updated: Mar 14, 2021

एका पारंपारिक सिंधी कुटूंबातील दृश्य. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याला उकळी फुटताच, हे पातेले साध्या सुती कापड्यांच्या आवरणाने झाकले जाते. या आवरणाच्या कापडावर एक आकर्षक पिवळ्या रंगाचा पीठासारखा पदार्थ काळजीपूर्वक ओतून पुन्हा दुसऱ्या कापडाने ते झाकले जाते. पाण्याच्या वाफेवर हे मिश्रण शिजून, छान म्हैसूर पाकासारखा दिसणारा पदार्थ तयार होतो. पुढे उघड्यावर वाळवून त्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि एक विशेष चवीचा गोड पदार्थ तयार होतो.

विस्मरणात चाललेल्या या सिंधी पदार्थाचे नाव ‘भूरी’. त्यालाच बूर, भूर, भुरानी मिट्टी, खरियत(Khirret) असेही म्हणतात. इराक आणि सिंध प्रांतातील हा पदार्थ जगातील सर्व वस्तूंची नक्कल तयार करू शकणाऱ्या ‘आपल्या’ उल्हासनगरात अगदी अस्सल दर्जाचा मिळतो. आपल्या पचनप्रक्रीयेला सहाय्य करणारा हा पदार्थ चक्क ‘परागकणां’पासून बनलाय हे ऐकून थोडे आश्चर्यही वाटेल. हे परागकण एका कणसापासून गोळा केलेले असतात.

पाण्यात उगवणाऱ्या व गवतासारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीचे नाव ‘पाणकणीस.’ खारपट्टयात रस्त्याकडेच्या नाल्यांमध्ये वृत्तवाहीन्यांच्या ‘बूम माईकप्रमाणे‘ उगवलेली वनस्पती पाहील्यासारखे आठवत असेल, तीच ही. हे कणीस बाजरीच्या कणसाप्रमाणेच दिसत असल्याने तिला जंगली बाजरी असेही म्हटले जाते. तर किनारी भागात तिची ‘रामबाण’ म्हणून ओळख आहे. पाणकणीस हे मांजराच्या शेपटासारखे झुबकेदार असल्याने तिचे इंग्रजी नाव ‘कॅट टेल’ असे आहे. बुलरश म्हणूनही तिचे नामकरण आहे.

टायफेसी कुलातील या वनस्पतीची शास्त्रीय नावे टायफा अँग्युस्टिफोलिया आणि टायफा अँगुस्टॅटा अशी आहेत. टायफा एलेफंटिना नावाची तिची दुसरी जातही आपल्याकडे आढळते. भारतासह आफ्रीका व इतर आशियाई देशांमध्ये पाणकणीसाच्या जाती आढळतात. सामान्यत: दलदल व साठलेल्या पाण्यामध्ये आढळ असला तरी नदी किनारीदेखील ती दिसून येते. ती बहुवर्षायू आहे. सामान्य गवतापेक्षा अधिकचे आयुर्मान असल्याने ती हळूहळू पाणथळ जागा व्यापत राहते. कणीस पिकल्यानंतर कापसासारखा भाग तयार होतो व त्यातल्या बिया वाऱ्याच्या मदतीने कापसासह सर्वदूर पोहोचत राहतात.

केवळ परागकणच नव्हे तर जमिनीतील खोड, कोवळ्या पानांमधील सुरळी आणि मुळी यांचा वापर खाण्यासाठी करता येतो. रामबाणाचे खोड पोटाच्या विकारांवर, मूत्रविकारांवर गुणकारी असते. त्याचबरोबर कांजण्यांमध्ये देखील आराम मिळविण्यास उपयुक्त ठरते. हगवण, अतिसारामध्ये देखील हा ‘रामबाण’ ईलाज ठरतो. पिकलेल्या कणसातील मऊ भाग जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास मदत होते. हाच भाग जाळून त्याची राखही जखमेवर लावली जाते.पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात रामबाण, शेंदूर व तेल यांचे मिश्रण एखाद्या मातीच्या भांड्यात ठेवून जखमेवरील औषध म्हणून वापरतात. पाणकणीसाच्या खोडाचा व पानांचा अनेक प्रकारे उपयोग करतात. यापासून पारंपारिक पद्धतीची चाळणी तयार केली जाते. काश्मिरमध्ये झोपड्यांच्या व शिकाऱ्यांच्या छपरांकरिता या गवताचा उपयोग होतो. पंजाबमध्ये त्यापासून चटया, दोर व टोपल्या बनवतात. ‘तिन्हो’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या तात्पुरत्या नावा या वनस्पतीपासून तयार होतात. या कणसातील सुकी फुले कापसारखी हलकी असतात व उष्णतारोधकही. या गुणधर्मामुळे ती गाद्या व उशा भरण्यासाठी वापरता येतात.

मानवाला उपयुक्त ठरण्याबरोबरच रामबाण निसर्गालाही सहाय्य करते. त्याची मुळे नदी व समुद्रकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात व त्यामुळे जमिनीची धूप थांबते. महाराष्ट्राच्या किनारी भागासह इतरत्रही विपुल प्रमाणात उपलब्ध असणारी ही वनस्पती इथल्या लोकांच्या प्रत्यक्ष वापरात मात्र नाही. स्थानिकांना तिचे महत्त्व लक्षात आणून देणे लाभदायक ठरेल. पाणकणीसचा बीजप्रसार बाणाच्या वेगाने होतोच, आता तिच्याविषयक ज्ञानाचा प्रसारही व्हावा. - तुषार म्हात्रे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page