top of page
Search

ठिपकेदार वडा

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Jan 7, 2022
  • 3 min read

अतिशय उत्साहाने एक नवखा फलंदाज मैदानावर दाखल होतो. टी-ट्वेंटीचा जमाना असल्याने अर्थातच पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजीला सुरुवात होते. एका जोरदार फटक्याने चेंडू मैदानाच्या बाहेर जातो. पण हा फटका खेळताना स्वयंचित होऊन फलंदाजाला देखील मैदानाच्या बाहेर व्हावे लागते. एका लहान चुकीमुळे त्याच्या आनंदाच्या क्षणाचे रूपांतर दुःखात होते. एका झटक्यात रंग बदलणारा असा प्रसंग कधी कधी एका वेगळ्या मैदानावर पहायला मिळतो. ‛खऱ्या’ मैदानाऐवजी हे कथानक ‛खाऱ्या’ मैदानावर घडते. लहान जाळ्याने मासेमारी करणारा एक नवखा मच्छीमार खाडीकिनारी आपले नशीब आजमावतो. सुरुवातीच्या प्रयत्नातच एक सुंदर आणि मच्छीमाराच्या दृष्टीने चविष्ट ठिपकेदार मासा जाळ्यात अडकतो. आनंदाच्या भरात तो मासा आपल्या साठवणीच्या भांड्यात ठेवत असतानाच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागतात. चांगला फटका खेळूनही स्वयंचित होणाऱ्या फलंदाजाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. आपली पुढील मासेमारी सोडून ती व्यक्ती निमूटपणे घराकडे वळते.

‘मासेमाराला अर्ध्यातच मासेमारी सोडून घरी परतण्याचे काय कारण असावे?’ ‘जाळ्यात सापडलेला तो ठिपकेदार मासा आहे तरी कोणता?’

ree

या सुंदर आणि खवय्यांच्या दृष्टीने चविष्ट माशाचे नाव ‛वडा’. महाराष्ट्राच्या किनारी भागात त्याचा स्थानिक उच्चार ‘वरा’ किंवा ‘वऱ्हा’ असाही होतो. परदेशांत त्याला अर्गस फिश, रेड स्कॅट, ग्रीन स्कॅट, लीपर्ड स्कॅट, बटर फिश, स्पेड फिश अशा अनेक नावांनी ओळखले जाते. स्कॅट कुटुंबातील या माशाची ‛स्कॅटोफॅगस अर्गस (Scatophagus argus)’ अशी शास्त्रीय ओळख खुद्द कार्ल लिनियसनेच जगासमोर आणली. त्याच्या ‘वडा’ या नावाला साजेसा एक चपट-गोल आकार त्याला लाभलाय. मूळ चंदेरी रंगाला एक हलकीशी हिरवट छटा त्याला अधिकच आकर्षक बनवते. हिरवट आणि लालसर अशा दोन रंगांमध्ये तो दिसून येतो. लालसर रंग असणाऱ्या माशाला ‘रुबी स्कॅट’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या आकर्षकपणाला दृष्ट लागू नये म्हणून की काय अंगभर उठावदार काळे ठिपके असतात. वयाने लहान वडा माशाचा आकार बराचसा गोलाकार असतो, पुढे हा आकार थोडा आयाताकृती होत जातो. तो जसा वयाने वाढतो तसे त्याच्या अंगावरील आकर्षक ठिपके फिक्कट होत जातात, तसेच हिरवट रंगही विवाहित पुरुषाच्या चेहऱ्यावरील रंगाप्रमाणे उतरत जातो. शरीर संरक्षणासाठी अंगावर दांतेरी खवले असतात. त्याच्या पाठीवरचे काटे ही त्याला स्वतंत्र ओळख प्रदान करतात.

ree

आपल्या “मासेमाराला अर्ध्यातच मासेमारी सोडून घरी परतण्याचे काय कारण असावे?” या प्रश्नाचे उत्तर या शरीररचनेत दडलेले आहे. वडा माशाच्या अंगावरील काट्यांमध्ये असलेल्या पेशी विषारी प्रथिने तयार करतात. या माशाचा दंश झाल्यास भयंकर वेदना होतात, विष पसरलेला शरीराचा भाग जड होतो. दंश झालेला भाग गरम पाण्यात बुडवून शेक घेतल्यास वेदना कमी होतात, सूज उतरते. माशाच्या या वैशिष्ट्यामुळे “वरा, नं धारील घरा!” असा एक वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. थोडक्यात त्याला व्यवस्थित न हाताळल्यास दंश होऊन घरी जायची वेळ येऊ शकेल. सहसा लहान आकारात दिसणारे हे मासे फूटभर लांबीच्या आकारातही आढळले आहेत. भारताच्या समुद्री किनाऱ्यापासून ते अगदी जपान, ऑस्ट्रेलिया पर्यंत तो सर्वत्र आढळतो. आपल्याकडे तो खाडी किनारी, कांदळवने, नदीच्या मुखाजवळ दिसतो. गोड्या -खाऱ्या पाण्याचे मिश्रण (Brackish Water) असलेला परिसर हा त्याचा मुख्य अधिवास. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या माशांच्या जीवनाची सुरुवात गोड्या पाण्यापासून झालेली असते. माशांच्या पिल्लांची वाढ गोड्या पाण्यात होत असली तरी या पिल्लांना गोड्या पाण्यात पोहोचण्यापासून संघर्ष करावा लागतो. प्रजोत्पादन हे खाऱ्या पाण्यातच होत असल्याने या पिल्लांना यातून स्वतःहून मार्ग काढत गोड्या पाण्यात पोहोचावे लागते. इथे वाढ झाल्यानंतर पुन्हा आपल्या खाऱ्या अधीवासाकडे त्यांचा मोर्चा वळतो. या सगळ्या धडपडीसाठी लागणारा काळ त्यांच्या हाती आहे. जवळपास वीस वर्षांचे आयुष्यमान या माशाचे असते.

ree

समुद्राशी संबंधित लोक त्याला खाण्यासाठी ओळखत असले तरी जगभरात तो त्याच्या आकर्षक रुपामुळे मत्स्यालयातील मासा म्हणूनच ओळखला जातो. लहान आकारातील हे मासे कित्येक घरांतील फिश टँकमध्ये पाहायला मिळतील. समुद्र असो की लहानसे काचेचे भांडे वडा मासा परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. या प्रवृत्तीमुळे जगभरातील त्यांचा आढळ (अजूनतरी) बऱ्यापैकी आहे. पण बहुधा स्वातंत्र्याची आवड असल्याने फिश टँकसारख्या बंदिस्त जागेत त्याचे प्रजोत्पादन होत नाही. दिसायला आकर्षक आणि तितकाच धोकादायक असणारा हा मासा कदाचित ‘निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या, पण त्याला हात लावण्यापूर्वी एकदा विचार करा’ असाच सल्ला देत असावा.

- तुषार म्हात्रे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page