top of page
Search

टायगर जिंदा है!

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Dec 2, 2020
  • 3 min read

बॉलीवूडच्या भाईजानचे दोन धम्माल सिनेमे आले ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है.’ नेहमीप्रमाणे अॅक्शनपॅक्ड कथानक आणि सलमानचा पडद्यावरील आकर्षक वावर या दोन्हींमुळे त्याच्या चाहत्यांना एक चांगली मेजवानी या चित्रपटांद्वारे मिळाली. आपल्या भाईबंदांपेक्षा तुलनेने तगडी शरीरयष्टी असणारा आणि नावातही ‘टायगर’ असणारा असाच एक जीव आपल्या सागर किनारी आढळतो. भाईजानच्या पोटावर ‘सिक्स पॅक अॅब्स’, तर या टायगरच्या पोटावरही ‘फाईव्ह पॅक अॅब्स’ अाहेत. एशियन टायगर श्रिम्प (Asian Tiger Shrimp) किंवा टायगर प्रॉन (Tiger Prawn) या नावाने परिचित असलेल्या या कोळंबीचे स्थानिक नाव आहे ‘करपाल’.

ree

या प्राण्याला करपाल हे नाव त्याच्या काळसर रंगामुळे प्राप्त झाले असावे. अपृष्ठवंशीय प्राणी वर्गातील आणि बाह्यकवच असणाऱ्या करपालीचे शास्त्रीय नाव आहे ‘पीनीयस मोनोडॉनंड (Penaes monodonand)’. काळपट रंगावरील पांढरे, पिवळे, तपकीरी आणि लाल रंगांचे पट्टे करपालीला अधिक लक्षवेधी बनवतात. करपालीच्या तोंडाकडील भाग हा बाहुबलीच्या मुकूटासारखाच भासतो. त्यावरच रत्न जडवल्यासारखे दोन डोळे असतात. हे रत्नासारखे डोळे अंधारातही चमकतात. करपालीला दोन लांबलचक मिशा म्हणजेच अँटेना असतात. त्यांना आपण ‘मिश-अँटेना’ म्हणूयात. यातील एका मिश-अँटेनाच्या साह्याने सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो, तर दुसऱ्या अँटेनाच्या साह्याने भक्ष्याचा अंदाज घेतला जातो. तोंडाच्या जवळच हातासारख्या अवयवांच्या तीन जोड्या असतात. आपले भक्ष्य पकडण्यासाठी ते हात वापरले जातात. कात्री वेगाने चालवल्यानंतर जसा आवाज निर्माण होतो तसाच आवाज हे प्राणी आपल्या हातांची वेगाने हालचाल करून निर्माण करतात.(थोडक्यात कोळंबीच्या जगात एका हातानेही टाळी वाजू शकते.) या आवाजाचा वापर ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात असे मानले जाते. आतून शांत वाटणाऱ्या समुद्रात आपल्या हस्तकलेने मोठा ध्वनी निर्माण करण्याची ही कला अनोखीच म्हणावी लागेल. या हातांना लागूनच शेपटाकडील दिशेला पायांच्या पाच जोड्या असतात. पाण्यातील तसेच चिखलावरील हालचालींसाठी त्यांचा वापर होतो. असे असले तरी पोटावरचे ‘फाईव्ह पॅक’ स्नायू आणि शेपूट यांच्या साह्याने झटका देऊन हालचाल करणे हे या जीवांचे खरे वैशिष्ट्य. याच झटक्याचा वापर करून त्यांना पाण्यातील अंतर वेगाने कापता येते.

ree

खाडीकिनाऱ्याचा दलदलयुक्त भाग, कांदळवने, सागर किनारे आणि खारजमिनीवरील शेतांमध्येही करपाल आढळते. सामान्यत: कोळंबी प्रजातीतील जीव समूहाने राहतात, परंतु नैसर्गिक क्षेत्रांतील करपालींची संख्या कमी असल्याने इथे हा समूह काहीसा लहान असू शकतो. पाण्याची योग्य क्षारता आणि वाढीसाठी आवश्यक तापमान असलेल्या या जागा त्यांना पोषक ठरतात. मिश्रहारी असलेला हा जीव सभोवताली उपलब्ध असेलेले सूक्ष्म वनस्पतीजन्य-प्राणीजन्य पदार्थ सेवन करतो. त्याच्यापेक्षा लहान सजीवांना तो आपले अन्न बनवू शकतो आणि मोठ्या भक्षकांचे अन्नही बनू शकतो. पुनरूत्पादन प्रक्रीयेत मिलनानंतर मादी करपाल आपली अंडी किनाऱ्यापासून जवळच्या भागांतच सोडते. या अंड्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पाच ते दहा लाखापर्यंत असू शकते. ही प्रक्रीया मिलनानंतर अतिशय वेगाने म्हणजे केवळ बारा ते पंधरा तासांत घडते. किनारी भागातील जैवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही या जीवाच्या बाबतीत मात्र ‘टायगर जिंदा है’ असे म्हणता येते ही समाधानाची बाब आहे. करपालींचे काही भाईबंद तर आपल्या परिसंस्थेत स्वच्छता अभियान चालवत असल्यासारखे काम करतात. या प्रजातीतील कोळंबीसुद्धा समूहाने राहतात. विशिष्ट मासे हे स्वच्छता केंद्र शोधत येतात. केंद्राजवळ येऊन शांतपणे पहुडतात. लगेचच सफाईकामगार कोळंब्या त्या माशाच्या तोंडातील अन्नकण, सूक्ष्मजीव यांचा फडशा पाडतात. या समन्वयातून कोळंबीला अन्न मिळते, तर माशांच्या तोंडाची स्वच्छता होते.

ree

शरीरांतर्गत हाडे (काटे) नसलेल्या या जीवाचे मत्स्य व्यवसायामध्ये सध्या सर्वाधिक उत्पादन होत आहे. (पहा, बिनकण्याने आणि कायम वाकून राहील्याचे फायदे!). अन्न म्हणून विचार केल्यास करपाल जातीच्या कोळंबीमध्ये खूप कमी उष्मांक असतात. याऊलट प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर या प्रजातींमध्ये सेलेनियम आणि काही अँटीऑक्सिडंटस् असतात, ज्यामुळे कर्करोगाच्या निर्मितीस कारणीभूत असणाऱ्या मुक्त कणांपासून बचावही होतो. या अलिकडच्या ज्ञात कारणांमुळेच थाटात राहणारा हा प्राणी खवय्यांच्या ताटात जाऊन पोहोचलाय.जीभेचे चोचले पुरवत स्वत:ची ‘फिगर’ जपणारे खवय्ये या प्राण्याची पृथ्वीवरील ‘फिगर’ कमी करत सुटलेत. असे असूनही सुदैवाने कोळंबी प्रजातींची संख्या (अजूनतरी) लक्षणीय आहे. परंतु ही संख्या मानवाच्या फायद्यासाठी कृत्रिमरित्या वाढवलेल्या टायगर प्रॉन्सची आहे.(खरंतर ह्या कोळंब्या म्हणजे एकप्रकारच्या समुद्रातील ब्रॉयलर कोंबड्याच!) पण खाण्यासाठी का होईना हा ‘टायगर’ अजूनतरी ‘जिंदा है!’. पण समुद्रातील मानवी हस्तक्षेप असाच कायम राहीला तर मात्र करपालीच्या बाबतीत ‘एक था टायगर’ असेच म्हणण्याची वेळ येईल रे नक्की. तूर्तास ‘टायगर जिंदा’ राहो हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page