top of page
Search

गोड फळे तिखट मुळे

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Jan 18, 2021
  • 2 min read

Updated: Feb 17, 2021

   ‘अॅडम आणि इव्ह’ या जोडीची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल. ‘इव्ह’ला बागेतील सुप्रसिद्ध फळ खाण्याची इच्छा होते. अॅडम मात्र हे फळ खायचे की नाही, या द्वीधा मन:स्थितीत असतो. पुढे हे फळ त्यांच्याकडून खाल्ले जाऊन मनुष्यप्राण्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान वगैरे मिळते असे काहीसे हे कथानक. बऱ्यापैकी ज्ञान असलेला आधुनिक मनुष्य पृथ्वीवर येऊन आता जवळपास दोन-तीन लाख वर्षांचा कालावधी लोटला आहे.अॅडम-इव्हने खाल्लेल्या फळांसारखी कित्येक फळे आपल्या पूर्वजांकडून पचवून झाली आहेत. पण तरीही कधीकधी आपल्या आजूबाजूला आपल्याला ज्ञात नसलेल्या अशा काही वनस्पती दिसतात, तेव्हा मात्र आपले ज्ञान अजूनही अॅडम स्तरावरचे आहे याची मनोमन खात्री पटते.

महाराष्ट्राच्या किनारी भागात फेरफटका मारताना खारफुटींच्या जंगलात सुंदर अशा पांढऱ्या जांभळ्या रंगांच्या लहान लहान फळांनी लगडलेला एक झुडूपसदृश वृक्ष दिसतो. त्याच्या फळांचा आकर्षकपणा आपल्यातील ‘इव्हपणा’ जागा करीत असला तरी ते फळ बाजारात पहायला मिळत नसल्याने खावे की न खावे असा ‘अादिम’ प्रश्न काहीजणांना पडतो. खारेपाटातील स्थानिकांना पूर्वापार  परिचित पण नवख्यांना अपरिचित अशा या वनस्पतीचे नाव ‘मिरजोळी’. काही ठिकाणी तिला खाकण म्हणून ओळखले जाते, तर मुंबई, रायगडच्या स्थानिक भागांत ही फळे ‘सायरा’ या नावाने ओळखली जातात. सॅल्व्हॅडोरेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सॅल्व्हॅडोरा पर्सिका(Salvadora persica). आधुनिक काळात या वनस्पतीकडे दुर्लक्ष होत असले तरी पूर्वीच्या काळी मात्र मिरजोळीला खूप महत्त्व होते. अथर्वसंहिता, पाणिनींची अष्टाध्यायी, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता यांसारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांत तिचा ‘पीलू’ या नावाने उल्लेख झाला आहे. या वनस्पतीची जितकी नामे आहेत, तितकीच तिची कामे आहेत!      

लांबून पाहील्यास मिरजोळीच्या पांढरट रंगाच्या गुळगुळीत फांद्या वेलीसारख्या लोंबताना दिसतात. पण प्रत्यक्षात ती वेल नाही, हे जवळ जाताच लक्षात येईल. तिची पाने साधीच पण साधारण मांसल असतात. फांद्यांच्या टोकांकडे आकर्षक असा फुलोरा दिसतो. त्यावर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हिरवट पिवळी व देठ असलेली लहान फुले येतात. त्यापासून सुंदर अशी लहान लहान फळे तयार होतात. चवीला गोड असणारी ही फळे मूत्रविकारांवर उपयुक्त असल्याचे उल्लेख आहेत. ‘गोड फळे आणि तिखट मुळे’ अशी या वनस्पतीची तऱ्हा आहे, कारण गोड फळांच्या या वनस्पतीची पाने व मुळे मात्र तिखट असतात. पानांचा काढा दमा व खोकला यावर उपाय म्हणून दिला जातो. उंटाचे खाद्य म्हणूनही या पानांचा वापर होतो. तर नामिबियामध्ये दुष्काळी भागातील जनावरांचा चारा म्हणूनही ही वनस्पती प्रसिद्ध आहे. या वनस्पतीच्या पानांचे गुणधर्म मोहरीच्या पानांप्रमाणे आहेत. पानांची मोहरीसारखी भाजीही केली जाते. त्यामुळेच या झाडाला ‘मस्टर्ड ट्री ऑफ स्क्रिप्चर्स’ म्हणतात. त्याच्या बियांचा वापर डिटर्जंट उद्योगात होतो.       या वनस्पतीच्या ‘मिसवाक’ आणि ‘टूथब्रश ट्री’ या दोन नावांवरून लगेचच त्याचा वापर लक्षात येईल. दात घासण्यासाठी त्याचा पूर्वापार वापर होत आहे. पांढऱ्या दातांना मजबूत करणाऱ्या या वनस्पतीचे लाकूड नरम व पांढरे असते. त्याला  रंधून व घासून त्याला चांगली झिलई प्राप्त होते. त्याला वाळवीचा उपद्रव होत नाही. या विशेष गुणांमुळे ईजिप्शियन लोक प्रेते ठेवण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या पेट्यांसाठी या वनस्पतीच्या लाकडाचा वापर करायचे.

ree

        वनस्पतीच्या या सर्व गुणांचा वापर करत अवगुणी मनुष्य आणखी काही उद्योग करतो. मिरजोळीच्या फळांवर प्रक्रीया करून मादक पेय बनविता येते. तसेच तपकीर तयार करताना त्यात या झाडाच्या सालीचे चूर्ण घालतात.            अतिपरिचय असणाऱ्या या वनस्पतीची वाटचाल अपरिचयाकडे होत चाललीय. खाडीकिनारी वसलेल्या उद्योगांसाठी, घरांंसाठी मिरजोळीसारख्या अनेक वृक्षांची कत्तल होत गेली. पण अजूनही ही वनस्पती माणसांंनी अनधिकृतपणे रचलेल्या भरावावर अधिकृतपणे उभी रहात आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली नजर तिकडे जाऊन तिला थोडा आधार मिळावा ही अपेक्षा. - तुषार म्हात्रे


 
 
 

3 Comments


rahimawasta
Jan 23, 2021

खुपच छान..!

Like

Tushar Chandrakant Mhatre
Tushar Chandrakant Mhatre
Jan 19, 2021

माझ्या शाळेच्या रस्त्याला खूप आहेत.

Like

ajit14021977
Jan 18, 2021

तुषारराव ! खूप छान माहिती ! मला आजच या वनस्पतीविषयी कळले. 👌👌👌

जितकी नामे तितकी कामे ! हे अद्भुतच आहे.

Like
Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page