top of page
Search

कॅच मी इफ यू कॅन!

  • Writer: Tushar Chandrakant Mhatre
    Tushar Chandrakant Mhatre
  • Dec 4, 2020
  • 3 min read

जेमतेम विशीचा वाटणारा ‘फ्रँक अबॅग्नेल’ नावाचा एक उमदा तरूण, ज्याच्या मागावर युरोप-अमेरिकेतील पोलीस आहेत. फसवणुकीचे कित्येक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पोलीसांनी त्याच्यासाठी रचलेल्या सापळ्यात प्रवेश करतो आणि सर्वांदेखत आपला कार्यभाग उरकून अलगदपणे निसटूनही जातो. आधी पुस्तकरुपात आणि पुढे चित्रपटाद्वारे गाजलेल्या सत्यकथेतील हा प्रसंग.

इकडे मुंबई-रायगडच्या खाडीलगत काही लोक मासेमारी करण्यासाठी गळ टाकून बसले आहेत. थोड्या वेळाने पाण्यात थोडी हालचाल जाणवते. गळ काढून पाहील्यानंतर त्याला लावलेले आमिष खाऊन मासा पसार झाल्याचे समजते. या परिसरात वेळ घालवण्यासाठी किंवा पोटापाण्यासाठी गळ टाकून मासेमारी करणाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडणाऱ्या मत्स्यकथेतील हा दुसरा प्रसंग.

या दोन्ही प्रसंगांतील कथानायक देखणे आहेत, चलाख आहेत. एका कथेचा नायक आहे पडद्यावर आकर्षक वावर असणारा लिओनार्डो डी कॅप्रियो, तर दुसऱ्याचा आहे पाण्यावर आकर्षक वावर असणारा ‘टार्गेट फिश’. दोघेही आपल्या कृतीतून म्हणतात, “Catch me if you can!”

ree

टेरापॉन जर्बुआ (Terapon Jarbua) असे शास्त्रीय नाव असणारा हा मासा ‘घोयां’ या स्थानिक नावाने ओळखला जातो. नेमबाजीच्या खेळात लक्ष्य(Target) म्हणून असणाऱ्या समकेंद्री वर्तुळांसारखे तीन वर्तुळाकार पट्टे या माशाच्या पाठीवर असतात. त्याच्या या वैशिष्ट्यामुळेच त्याला ‘टार्गेट फिश’ म्हणतात. चंदेरी रंगावर असणाऱ्या काळ्या पट्ट्यांंमुळे त्याला टायगर पर्च, टायगर फिश, झेब्रा फिश अशीही नावे आहेत. तर या पट्ट्यांची रचना चंद्रकोरीप्रमाणे असल्याने त्याला ‘क्रिसेंट पर्च’ असेही म्हटले जाते. जगभरातल्या समुद्रकिनाऱ्यांलगत आढळणारा हा मासा विविध तापमानात, तितक्याच वेगवेगळ्या क्षारतेच्या पाण्यातही तग धरून राहू शकतो. मुंबई परिसरातल्या खारफुटीलगतच्या अरूंद खाऱ्या प्रवाहांमध्ये तो पहायला मिळू शकतो. सरासरी वीतभर लांबी असणाऱ्या या माशाची सर्वाधिक लांबी फूटाहून अधिक असल्याची नोंद आहे. सहसा घोयां मासे समूहात शांतपणे राहतात. परंतु एकट्याने असताना ते अधिक आक्रमक होतात.

ree

हा मासा मिश्राहारी आहे. पण लहान मासे आणि कोळंबी, खेकडे हे त्याचे प्रमुख अन्न. हा जीव लहानसा असला तरी त्याची भूक मोठी आहे. प्रत्येक तासा-दीड तासाला खाऊचा हट्ट धरणाऱ्या लहान मुलांसारखंच त्यालाही वारंवार खायला लागतं. खाण्याच्या या सवयीमुळेच तो ‘अन्नासाठी दाही दिशा, आम्ही फिरविसी जगदिशा’ करत फिरत राहतो. या खाद्यभ्रमंतीत त्याच्या मेनूकार्डवर ‘माशांची खवले’ या वेगळ्या पदार्थाचीही नोंद होते. घोयां मासा त्याच्यापेक्षा आकाराने मोठ्या आणि जिवंत माशांची खवले खातो. कमी दृश्यमानता असलेल्या परिस्थितीत संथपणे पोहणाऱ्या माशांच्या शेपटाकडील भागावरील खवले तो सहजपणे काढून खातो आणि पचवतोदेखिल. फसवणूक करणाऱ्या फ्रँक अबॅग्नेलच्या कौशल्याचा वापर एफ.बी.आय. या अमेरिकन गुप्तहेर संस्थेने गुन्ह्यांच्या उकलींसाठी करून घेतला होता, घोयां माशाचा तसाच उपयोग हे संथपणे पोहणारे मोठे मासे आपल्या अंगावर खवलांआड लपलेले बाह्यपरजीवी काढून टाकण्यासाठी करतात. फेब्रुवारी ते जून हा या माशांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पावसाळी दिवसांत त्यांची लहान लहान पिल्ले थव्याने आढळून येतात.

ree

गळ टाकून मासेमारी करणाऱ्यांसाठी हा मासा नेहमीच डोकेदुखी ठरतो. कॅटफिश प्रजातीतले बरेचसे मासे गळाला लावलेले आमिश गळासहीत गिळल्याने आयतेच सापडले जातात, परंतु घोया मात्र गळ न गिळता आपल्या मजबूत दातांनी गळाला लावलेले आमिष कुरतडून खातो. त्याची गळाला अडकण्याची संभाव्यता इतर माशांच्या तुलनेत अत्यंत कमी असते. त्यातच हे मासे समूहाने संचार करत असल्याने एकाग्रतेने गळ टाकून बसणाऱ्यांच्या संयमाची कसोटीच लागते. अशा वेळेस नेहमीचे मासेमार त्याच्या मागे न लागता स्वत:हून जागा बदलतात.

त्याचे आकर्षक रूप आणि आकाराने लहान असणे या गोष्टी त्याला समुद्राच्या मुक्त जगातून ‘फिश टँक’ नावाच्या बंदिस्त जगात आणून सोडतात. मानवाच्या निर्जीव घरात त्याची सातत्याने होत असलेली हालचाल जिवंतपणा निर्माण करते. अन्न म्हणून या माशाचा वापर होतोच, पण त्याचबरोबर शरीरातील पेप्टोन नावाच्या प्रथिनाचा वापर जैवविज्ञानात होतो.

ree

आपल्या चपळ स्वभावामुळे शत्रूंना सातत्याने गुंगारा देणारा घोयां मासा, निसर्गाच्या शत्रूपुढे मात्र हतबल होतो. पर्ससीन नेट आणि इतर प्रकारच्या लहान छिद्र असलेल्या तसेच विस्ताराने मोठ्या असलेल्या जाळ्यांमध्ये हा मासा ‘नको असलेले सावज’(Bycatch) म्हणून सापडतो. मुंबईला जवळ असलेल्या खारजमिनींना विकासकांनी ‘टार्गेट’ केल्याने येथिल परिसंस्थांच्या आधारे जगणाऱ्या ‘टार्गेट फिशच्या अस्तित्वालाही घरघर लागली आहे. इथल्या लहान लहान जलाशयांमध्ये थव्याने आढळणारे घोयें, आता अभावानेच दिसताहेत. IUCN सारख्या आंतराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेनेही या प्रजातीला धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत टाकलंय. घरातल्या फिशटँकमध्ये सळसळणारा हा मासा निसर्गाच्या विशाल टँकमध्ये पुन्हा एकदा दिमाखदारपणे सळसळावा आणि ‘कॅच मी इफ यू कॅन’ म्हणत त्याने आपली नेहमीच फसवणूक करावी ही अपेक्षा.


- तुषार म्हात्रे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9820344394

©2020 by The Riyan Kinare. Proudly created with Wix.com

bottom of page